DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

शिक्षक आणि विद्यार्थी एक संवेदनशील नाते


शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते फार संवेदनशील असते. 'हृदयीचे गुज कळे काळजाला, जीवाशिवाचा आत्मा मिळाला'.
   'गुरुजनापायी वाहिली भक्ती
    होई भवसागरातूनी ही मुक्ती
       "छडी लागे छम छम, विद्या येई घम घम" असे म्हणत तळहातावर वळ उठवणारे शिक्षक आज उरले नाहीत. कारण शासनानेच त्यांचे हात बांधले आहेत. पूर्वीच्या काळी पालक आपल्या मुलाला शाळेत प्रवेशासाठी घेऊन येत ते पुन्हा दाखला नेण्यासाठीच फिरकत. बाकी सर्व गुरु नि शिष्यावरच सोडून देत.त्याकाळी गुरुजींनी मारले, झोडले तरी त्याची तक्रार कोणाकडेही करता येत नसे. परंतु त्या मारण्या-झोडण्यातही विद्यार्थ्यांच्या प्रती आत्मीयता, तळमळ दिसून यायची. आपला विद्यार्थी उगीच इकडे तिकडे न उंडारता कुणीतरी मोठा बनावा हीच वृत्ती त्या गुरुची विद्यार्थ्यांप्रती दिसुन यायची. त्यामुळे आपल्या मुलाला एकदा गुरूच्या ताब्यात सोपवले की आई-वडील देखील मुक्त व्हायचे. कारण गुरुविषयी त्यांना पूर्ण विश्वास असायचा.
काळ बदलला... शिक्षणाचा पॅटर्न बदलला.शिक्षण देणे म्हणजे पैसा कमावणे ही वृत्ती वाढीस लागली आणि खाजगी शिकवण्यांचा सुळसुळाट झाला. "जास्त फी आकारणारा शिकवणीवर्ग जास्त चांगला" अशा समजातून पालक आणि आणि विद्यार्थी भरकटत गेले. शिकवणी वर्गांमध्ये जास्त फी घेण्याची चुरस सुरु झाली. इथे शिक्षणापेक्षा अवांतर गोष्टींना जास्त महत्त्व आले. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन झाले की नाही हे ओळखण्यासाठी 'परीक्षा' ठेवण्यात येऊ लागल्या.
फक्त गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळू लागला. यातही पैसेवाल्या धनदांडग्यांची मुले उच्च शिक्षण किंवा चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी रांग लावू लागली. कॉलेजेस मागतील तेवढे डोनेशन देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू लागली. यात गरीब,होतकरू विद्यार्थी मात्र भरडला जाऊ लागला.
आजही शाळेतील शिक्षक मात्र मुलांचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येतात. जिथे पैशाचा अपव्यय किंवा काळाबाजार यांची लयलूट नसते. आपल्या शाळेतील विद्यार्थी ज्ञानोपासणेसाठी येत असतात आणि त्यांना ज्ञानदान करणे हे आपले परमकर्तव्य आहे हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून त्याला करियरसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी पात्र बनविले जाते. मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्न करताना 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... देता घेता देणाऱ्याचेच मग हात घ्यावे' असा गुरु आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नेहमीच झटताना आजही दिसतो. शेवटी "देणाराही परत घेऊ शकत नाही, अशी भेट म्हणजे शिक्षण"....
आजही विद्यार्थी आपले गुरु समोर दिसताच आपसूकच चरण स्पर्श करण्यासाठी झुकतो... यातच शिक्षकाची 'खरी कमाई' दडलेली आहे...


Post a Comment

0 Comments