कोरोनाच्या काळात प्रत्यक्षरित्या थांबलेली शिक्षण प्रणाली आज आॅनलाईनच्या आधुनिकीकरणात येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांनी पाल्यांमध्ये असलेल्या अंतर्गत कलागुणांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन हा ७ वर्षांचा असताना त्याचा परिवार मिशिगन येथे स्थलांतरित झाला. तेथील शाळेत शिक्षण घेत असताना एक घटना घडली होती. शाळेतील शिक्षक एडिसनला मतिमंद आणि स्पष्ट विचार करण्यास अक्षम असा विद्यार्थी समजत. एके दिवशी एडिसन घरी आला व त्याने त्याच्या आईला कागद दिला आणि म्हणाला, “आई माझ्या शिक्षकांनी मला हा कागद दिला व फक्त तुझ्या आईला वाचायला दे असे सांगितले. आई काय लिहिलंय त्यात?” ते पत्र पाहून तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.
एडिसनच्या आईने त्याला सांगितले, “या पत्रात असे लिहिले आहे की, तुमचा मुलगा अत्यंत हुशार व प्रतिभाशाली आहे. आमची शाळा तेवढी सक्षम नाही आणि त्याला शिकवण्यायोग्य शिक्षक आमच्या शाळेत नाहीत त्यामुळे तुम्हीच त्याला शिकवा.” आईचा मृत्यू झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी थॉमस एक महान संशोधक ठरला. एक दिवस कपाटात लहानपणी शिक्षकांनी आईस वाचायला दिलेले पत्र त्याला सापडले. त्याने ते वाचले. त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुमचा मुलगा मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. आता आम्ही त्याला शाळेत येऊ देऊ शकत नाही. त्याला शाळेतून काढण्यात आले आहे.” हे वाचून एडिसन भावुक झाला. मग त्याने त्याच्या डायरीत लिहीले : “थॉमस एडिसन हे मानसिकदृष्ट्या कमजोर बालक होते, ज्याच्या आईने त्याला शतकातील अलौकिक बुध्दीमत्ता असलेला मनुष्य बनवले."
पालक : आज आपण पाहतो की, प्रत्येक पालक हा त्याच्या पाल्याच्या करिअरविषयी चिंतित असतो. मुलांच्या आयुष्यातील सर्वाधिक जवळचा व्यक्ती म्हणजे त्यांचे पालक. मुलाच्या जन्मापासून ते पालकांच्या सानिध्यात असते. पालक म्हणून आपण आपल्या मुलांना व त्यांच्यातील क्षमता कितपत ओळखतो हे अतिशय महत्वाचे असते. पालकांनी स्वतःच स्वतःची मुलं व त्यांच्यातील क्षमता ओळखल्या नाहीत तर मग जग कसे ओळखणार? ज्या पालकांना स्वतःच्या मुलांच्या क्षमता ओळखता येत नाहीत असे संभ्रमित पालक मुलांच्या करिअर व आयुष्याचे निर्णय दुसऱ्यांचे सल्ले व मार्गदर्शनानुसार घेतात. काही जण तर कॉम्प्युटरवर हाताचे ठसे घेऊन त्याचा रिपोर्ट घेऊन येतात व त्याला पाच हजार देतात खुळे पालक. जर पालक स्वतःच्या मुलांना ओळखू शकत नसतील, तर जगातले कोणतेच शास्त्र त्यांच्यातील क्षमता शोधू शकत नाही. एडिसन म्हणतो, "A positive word of encouragement can help change anyone’s destiny." म्हणजे प्रोत्साहनपर एक सकारात्मक शब्द एखाद्याचे नशीब बदलण्यास मदत करू शकतो.
स्वतः : आज आपण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःला कितपत ओळखतो? याचा विचार करण्याची आज खरच आवश्यकता आहे. स्वतःवर किती आत्मविश्वास आहे? आपण स्वतः आयुष्यात काय साध्य करू शकतो? आपण तितके सक्षम आहोत का? हे तपासावे. म्हणजेच स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. आपल्या क्षमता व कमतरता काय आहेत हे ओळखावे. नवीन कौशल्ये आत्मसात करावी. यावर स्वामी विवेकानंद लिहितात, "You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. Achieving your goals in life is impossible without personal development. In order to break through what stands between you and success, you must identify it first. You do this by turning your attention inwards and getting in touch with your higher self, your soul. There is more power and wisdom inside of you than can ever be taught to you by a teacher or guru.”
आपण काय करावे? : आपण आपला आत्मविश्वास तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या क्षमतेबद्दल साशंकता असेल तर त्यावर पुनर्विचार करून योग्य सुधारणा करणे आवश्यक आहे. पाल्यास सतत अपयश येत असेल तर एकतर पालकांचा पाल्यावर विश्वास नसतो किंवा पाल्यांमध्ये काहीतरी कमतरता असते. त्यामुळे आयुष्यात यश मिळवायचे असेल तर स्वतःतील क्षमता ओळखणे आवश्यक आहे. तुम्ही पालक असाल आणि तुमच्या पाल्यात काही कमतरता असेल तर मुलांना नेहमी प्रोत्साहित करून त्यांच्या मनात सकारात्मक विचार आणणे आवश्यक आहे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमधले नेतृत्त्व गुण व क्षमता महाराजांच्या बालपणीच ओळखल्या होत्या आणि त्या पद्धतीनेच हिंदवी स्वराज्य स्थापनेचे संस्कार व प्रशिक्षण त्यांना राजमाता जिजाऊ यांनी दिले.
पालकांमध्ये दडलेल्या प्रत्येक गुरुस गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
0 Comments